मुंबई : येत्या काही दिवसातच मुंबईसह देशभरात चहाच्या गाड्यांवर चहासोबतच फुकटात वाय-फायही मिळणार आहे. ‘मुफ्त इंटरनेट’ ही संस्था 2016 पर्यंत देशभरातील चहाच्या टपऱ्यांवर सर्वच सार्वजनिक ठिकाणी ही सुविधा सुरू करणार आहे.

साधारणत: 500 रुपयात 50 जण 30 दिवसांसाठी एकदा इंटरनेट अॅक्सेस करू शकतात. म्हणजेच इंटरनेट अॅक्सेससाठी प्रत्येकी 10 रुपये मोजावे लागतात. पण ‘मुफ्त इंटरनेट’ने हे पैशाचं जाळं भेदून, सार्वजनिक ठिकाणी फुकटात इंटनेट अॅक्सेस पुरवण्याचा चंग बांधला आहे. चहाच्या टपऱ्या, कॅफेज, शाळा, रुग्णालये, रेल्वे स्टेशन्स यासारख्या सर्व सार्वजनिक ठिकाणी इंटरनेट फुकटात वापरता येईल.

“ना नोंदणी शुल्क, ना डेटा फी, MUFT WiFi hotspots हे फुकटात नेहमी इंटरनेट सेवा देईल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी फक्त मुफ्त वाय-फाय अकाऊंट (MUFT WiFi account) क्रिएट करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्ही कुठेही, कधीही फुकटात इंटरनेट वापरू शकाल” असं ‘मुफ्त इंटरनेट’चे सहसंस्थापक विपुल पटेल यांनी सांगितलं.

‘मुफ्त इंटरनेट’ सध्या ही सेवा प्रत्यक्षात आणण्यासाठी जोमाने कामाला लागली आहे. सध्या 85 % भारत ऑफलाईन आहे. अनेक लोक याबाबत अद्याप जागृत नाहीत. मात्र फ्री इंटरनेमुळे जनतेला त्यांचा हक्क मिळेल आणि ते जगासोबत येतील, असं पटेल यांचं म्हणणं आहे.

‘मुफ्त इंटरनेट’ हे सरकारी अॅथोरिटी, उद्योग तज्ज्ञ आणि सिलीकॉन वॅली गुंतवणूकदारांसोबत मिळून ही सुविधा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काम करत आहे.

काही कॅफे, रेस्टॉरंट मोफत वाय- फाय पुरवत असल्यामुळे, त्यांचा बिझनेस वाढला आहे. मात्र आता ‘मुफ्त इंटरनेट’च्या माध्यमातून चहाच्या टपऱ्यांवरही मोफत इंटरनेट पुरवलं, तर लोक तिकडेही धाव घेतील. त्यामुळे त्यांचाही बिझनेस वाढू शकेल, असं नेहा रांभिया या माजी आयआयटीयन्सने म्हटलं आहे.

http://abpmajha.abplive.in/incoming/2015/01/18/article478861.ece/Chaiwalas-to-offer-free-WiFi-in-Mumbai